बुधवार, १५ जून, २०११

रनरनते उन दिसते कसे...
पहिले नाही मी कधीच..
पण त्याचे चटके मात्र सोसलेत..
आयुष्यभर..

पहिल्या पावसाने भिजलेली माती..
किती सुंदर ते नाही माहीत मला..
पण, तिचा सुगंध मात्र भरलाय
माझ्या मनभर..

भरून आलेले आभाळ आणि वीज
पहिलेच नाही मी कधी..
पण त्यांच्या कडकडाटाने
मिळते मला चाहूल त्यांच्या येण्याची..

इंद्रधनू म्हणे सात रंग घेऊन येते..
कसे दिसते ते मात्र माहीत नाही..
पण किती आनंद देते हे कळते
सर्वांच्या आवाजावरून..

हे सर्व मी जाणून आहे तरीही..
एकदा मला हे जरा वेगळे अनुभवायाचे आहे..
ते उन.. तो पाउस.. भरलेले आभाळ..
इंद्रधनूचे रंग.. सारे सारे मला..
माझ्या डोळ्याने पहायचय....

फक्त एकदा दिसू देवा मला हे सारे कसे दिसते..
साठवून ठेवीन मनात सारे..
बंद करेन पुन्हा डोळे.. कायमचे..
खरंच देवा.. तुझी शपथ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा