निसर्ग... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्ग... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

पावसाची गोष्ट


पावसाची गोष्ट पाउस
रात्रभर सांगत राहिला..
अन् घरामागचा डोह
दुथडी भरून वाहत राहिला.. (चं. गो.)

पाउस कधी हसत होता..
मेघांतून गडगडाट करून..
मधूनच रडू लागायचा...
मुसळधार पडून...

पावसाला भानच नव्हतं..
डोह, कधीचाच गेलाय भरून..
पावसासाठी, मेघ ठेवून...
त्याचं दुःख भरून घेतोय..

डोह मात्र दुःख घेऊनही
केवळ सुख वाटत होता..
भेगाळलेल्या धरतीवरल्या
पाटाकडे वाहत होता...
__________________-मनस्वी.. (प्रेरणा - आदरणीय चं. गो.)
१४:३५ - ३० ऑगस्ट २०१२

मंगळवार, २६ जून, २०१२

तो आला आला म्हणून 
सगळे आनंदून गेले होते..
आता सारी दुःखे धुवून जातील
अशी अशा बाळगून होते...

तो आला खरा, पण मग 
अचानक गायब झाला कुठेसा...
त्यानेच अशी पाठ फिरवली तर
कुणावर ठेवायचा भरोसा?

तुला हवं ते देतो...
खोटं नाही अगदी खरे...
पण आता त्रास नको देऊस...
पावसा, एकदाचा आता पड रे...
________________________-मनस्व
26 jun 2012 - 21:23

मंगळवार, ५ जून, २०१२

तो आला.. अन्


तो आला..
थंडगार वार्‍यावर
मृद्गंध स्वार झाला..
भेगाळलेल्या धरेसाठी
कृष्णमेघ जलधार झाला..

तो आला.. अन्
पाणावलेल्या डोळ्यांमधले
खारे पाणी मधुर झाले..
उन्हात जळुनी कोमेजलेले
मन पुन्हा मोहरुन आले..


तो आला.. अन्
सारी सृष्टी
पुन्हा नव्याने खुलू लागली..
आनंदाच्या महापुराने
दुःखे सारी धुवून गेली..

सोमवार, ४ जून, २०१२

पाउस... वाट पहात आहे..


तिला तो आवडला होता.. 
अगदी मनापासून.. 
अडचण एकच होती.. 
तिला.. त्याच्या मनातलं
माहीत नव्हता.. 


तसे तिने बरेच प्रयत्न केले...
त्याला आपलं मन कळावं,
तिच्या त्याच्यावरचं प्रेम..
त्याला दिसावं...
पण, यश काही मिळत नव्हतं..


एक दिवस अचानक
पाउस तिच्या मदतीला आला...
दोघेच सोबत फिरत असताना..
अचानक तिचा पाय घसरला..


त्याने तिला सावरलं..
अन् दोघांची नजरानजर झाली..
तोच क्षण होता..
जेव्हा तिच्या मनातल्या प्रेमाची..
त्याला प्रचीती आली..


पाउस असाच येत असतो..
आधून मधून..
अश्याच कोण्या दोघांच्या सोबतीला..
त्यांच्या मनातलं अव्यक्त प्रेम..
एकमेकांपर्यंत पोहोचवायला..


आता पुन्हा असेच दोघे..
कुठेतरी झुरत आहेत..
पाउस कदाचित त्यांच्या
बाहेर पडण्याचीच वाट पहात आहे.. 

मंगळवार, २९ मे, २०१२

आता... नक्कीच येईल तो...


कैक दिवस झाले..
त्याची भेट होऊन..
आता जीव थकून गेलाय
त्याची आठवण काढून...

आता येईल तो..

त्याच्या अनुपस्थितीत
खूप काही बिघडलंय..
आता त्याचीच आस आहे..
त्याच्याविना सारं अडलंय..

आता येईल तो..

तो आला..  की सारे जग
पुन्हा प्रफुल्लित होईल...
तो आला... की सारी सृष्टी
सगळे दुःख विसरून जाईल..

आता... नक्कीच येईल तो...

शुक्रवार, २५ मे, २०१२


का कोणास ठाऊक
अचानक आकाश भरून आलं...
लख्ख ऊन पडलेलं असताना
अचानक अंधारून आलं..

जोमाचा वारा सुटला..
सारा पाचोळा उडवून गेला...
घोंघावत अवकाशी पोचला
मग अचानक शांत झाला..

मेघ जमलेले जणू चिडलेले
गडगडात मोठा झाला..
संघर्षातून त्या मेघांच्या
वीजेचा लोळ धरेवर आला..

मेघ फाडून मग जेव्हा
पाऊस बरसत उतरला
सृष्टीच्या भयाणतेतून
जणू आनंद बहरू लागला..


एक वाहता निर्झर
किरर्रता भयाण सोबती
पाचोळ्यात होई सळसळ..
अन् एक किंकाळी... अजाणती

कोणास लपवतो आडोसा
कोणाचे हास्य ते भेसूर...
वणवा लागतो कुठेसा..
आसमंती दाटला धूर...

झाकोळला तो सूर्य...
अंधार दाटूनी येतो..
उरातले चोरूनी धैर्य..
केवळ भीतीच देऊनी जातो..

सोमवार, २१ मे, २०१२

ओढ..


अमावस्येला चंद्र नसतो..
मी मात्र तिथेच जाउन बासतो...
पौर्णिमेचा चंद्र...
मी जिथून न्याहाळत असतो...

अंधार असतो भरून आलेला..
चांदण्या सजुन आलेल्या...
चंद्र नसतानाही माझ्या नजरा...
चंद्राकडेच लागलेल्या...

माहीत असता.. चंद्र येणार नाही..
तरीसुद्धा मला
काहीच फरक पडत नाही..
कारण, माझी चंद्राबद्दलची ओढ..
तिथीनुसार बदलत नाही...

सोमवार, १६ एप्रिल, २०१२

पहिलाच पाउस...

आकाशात मेघांची पहिलीच गर्दी..
येणार्‍या पावसाची पहिलीच वर्दी..

पहिलीच वीज कडाडणारी ..
पहिल्या नजरेत जिंकून घेणारी..

पहिलाच थेंब.. पहिलाच पाउस...
मनात जागली भिजण्याची हौस..

पहिलीच वार्‍याची झुळुक खास..
पहिलाच, मातीचा मंद सुवास..

पहिल्याच पावसाची पहिली गार..
पहिल्याच पावसाने भिजलेला पार...

पहिल्याच पावसाने बहरला निसर्ग
पहिल्याच पावसात गवसला स्वर्ग..

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

शून्य

विश्व एक शून्य...
शून्यातला मी एक...
शुन्यालाच अर्पिलेला..
क्षण माझा प्रत्येक...

लढत राहतो अस्तित्वाशी..
पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी..
झुगारूनी सृष्टीचे नियम सारे..
शून्याची वृद्धी करण्यासाठी..

शून्य पाहता वाटे नगण्य...
परि असे तो सर्वस्व अनंत...
सुरवात विश्वाची शून्याशी होते..
त्यातच होतो... विश्वाचा अंत..

शुक्रवार, ८ जुलै, २०११

माझ्या कोकणात...

नितळ निळा किनारा..
भन्नाट वाहणारा वारा.
अंगावरी शहारा.. माझ्या कोकणात...

नारळी, पोफळीची गर्द झाडी
दगडी भिंतीची कौलारू माडी
सामोरी उभी खिल्लरी जोडी.. माझ्या कोकणात...

निवांत गाव, निवांत पार..
सारा निसर्ग हिरवा गार..
माणसांच्या मनात मायेची धार... माझ्या कोकणात...

रविवार, ३ जुलै, २०११

पाउस ज्येष्ठातला....
जोशात सुरूवात करणारा...
वैशाख वणव्यातल्या
मातीस भिजवणारा...
मृदगंधाच्या साथीने
सार्‍या सृष्टीस मोहवणारा...
पाउस ज्येष्ठातला...
जोशात येणारा..
अन् पुन्हा हळूच दडून बसणारा...

सोमवार, २० जून, २०११

पाउस श्रावणातला...

पाउस श्रावणातला...

कधी बरसून जातो इतका..
सारा निसर्ग चिंबून जातो
कधी शिंपतो केवळ मोती
अन् निसर्ग चमकून उठतो..

पाउस श्रावणातला...

कधी येतो इतक्या जोराने
की वाहून नेतो सारे..
कधी आणतो दाखवण्या..
इंद्रधनू एक न्यारे..

पाउस श्रावणातला...

बुधवार, १५ जून, २०११

पाउस का नाही पडत ?
मीच किती पाणी गाळायचे?.. रडत?
अगदी सुकून गेलेत तेही..
पाणी नाहीए.. डोळ्यातही..
पण हे देवाला कसे नाही कळत?

पाउस का नाही पडत ?
पाउस... आत्ता कुठे पडू लागलाय...
अजुन तरी फक्त माती भिजलिये...
आत्ता कुठे झरा वाहू लागलाय...
आत्ता कुठे फुटू लागलेत अंकुर...
हळूहळू सारे अंकुर आकार घेऊ लागतील..
हळूहळू त्यांना थोडा रांग चढत जाईल..
झरेहि होतील मोठे, अन् वाढेल खळखळात..
डोंगर दर्यांतून वाहताना होतील त्यांचे धबधबे..
तेव्हा कुठे म्हणता येईल...
पाउस... झाला बरं का..
नाहीतर काय...
अंगणात पाण्याचा सडा....
थोडासा मातीला सुगंध... आणि...
थोड्यावेळाने... धरेला.. पुन्हा.. तडा...

मी परत आलोय...

संध्याकाळ...
सूर्य... दिवसभर फिरून थकलेला
अगदी लालबुंद झालेला.
हळू हळू मावळू लागतो..
आणि.. अचानकच अंधाराला
नवा उन्माद चढू लागतो..
पुन्हा एकदा अंधाराचे साम्राज्य येते...
आणि अंधार आपला तो उन्माद,
माज सार्‍या जगतावर पसरवून टाकतो...
सार्‍या जगावर आपले सावट पसरवत..
अगदी निर्लज्जपणे त्याच्याच रंगाप्रमाणे..
किंबहुना त्याहूनही कृष्णवर्णीय कृत्ये करू लागतो...
आणि त्याला असे वाटू लागते...
बस्स... आता राहणार तो फक्त मीच...
कोण अडवणार मला?
कोण वाचवणार या जगास माझ्यापासून?
माझ्याच कवेत तर राहणार सगळे...
पण तेवढ्यात कुठून तरी
एक प्रकाश किरण येतो...
आणि त्या मागो माग...
अंधरावर मात करत...
पुन्हा.. सूर्य येतो...
अन् म्हणतो..
"या जगाचा उद्धार करायला...
मी आलोय....
होय... मी परत आलोय..."

पावसाची रुपे

सगळेच कवी म्हणे
पावसावर कविता करतात...
बिचारे काय करणार?
तेवढे शब्दच त्यांना सुचतात...

पाउस असतोच असा...
कधी रिमझिमता... कधी कोसळता...
कधी अगदी सरळ तर कधी... आडवा तिडवा...

कधी पाउस त्या दोघांना भेटतो..
प्रेमाचे निमित्त बनून..
कधी दोघांना झुरवतो..
त्यांच्या भेटीत अडथळा बनून...

कधी पाउस ओढ देतो...
शेतकरयाच्या कौलाला
कधी पाउस उधाणतो...
बळीराजाला काळजी देऊन...

कधी तो जणू रुसूनच बसतो...
येतच नाही भेटीला...
कधी इतका बरसतो..
किती बसतो सार्यांची भीती होऊन...

पावसाची रुपेच इतकी..
की शब्द तरी किती शोधणार?
पाउस तर आहे... म्हणून
कवी स्वतःला... कसा थांबवणार?

पाउस कसा हा आज..

नुसतं भरून आलंय अंधारतंय
कोसळत काही नाही..
हा पाउस असा का वागतोय?
तेच कळत नाही..

वाटते जणू आता बरसेल..
होईल ही माती ओली..
मातीच्या त्या सुगंधाने..
भरेल मी मनझोकाळी...

वारा सुटतो.. गारवा भरतो..
आसमन्तात सार्‍या...
वाटते जणू आता पडतील
आकाशातुन गारा...

का जाणे पण बरसात नाही..
पाउस कसा हा आज..
फुलवून धरतीवरला निसर्ग..
का चढवीत नाही साज... ?

तो ही 'तिची'च वाट पाहत होता..

मेघांनी जणू उच्छाद मांडला होता,
वीजांनी एकच गोंधळ उडवला होता..
इतके सारे होऊनही
पाउस काही पडत नव्हता..

ती आली..
अन् पाउस धो धो कोसळला..
जणू माझ्यासोबत,
तो ही 'तिची'च वाट पाहत होता.

मंगळवार, ३१ मे, २०११

पाउस.. माझ्या मनातला

मला नाही माहीत..
माझ्या मनातला पाउस..
नेमका कसा दिसतो...

इतकं मात्र खरं आहे..
की तो वर्षभर पडतच असतो..

कधी रिमझिमता
कधी धो धो बरसत असतो..

कधी सुकल्यासारखा होतो..
अन् मग अचानकच येतो..

प्रत्येकवेळी तो मला
पुरता भिजवून जातो...

खरंच मला माहीत नाही..
माझ्या मनातला पाउस
नेमका कसा दिसतो...