सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २६ जून, २०१२

तो आला आला म्हणून 
सगळे आनंदून गेले होते..
आता सारी दुःखे धुवून जातील
अशी अशा बाळगून होते...

तो आला खरा, पण मग 
अचानक गायब झाला कुठेसा...
त्यानेच अशी पाठ फिरवली तर
कुणावर ठेवायचा भरोसा?

तुला हवं ते देतो...
खोटं नाही अगदी खरे...
पण आता त्रास नको देऊस...
पावसा, एकदाचा आता पड रे...
________________________-मनस्व
26 jun 2012 - 21:23

बुधवार, ३० मे, २०१२

सरकार


रस्त्यावरचं गरीब पोर
रोज उपाशीच झोपी जातंय
बेरोजगारीत वाढ होताना
सरकार विकासाच्या गप्पा मारतंय

पोट भरायला अन्न नाही
पाण्याविणा वासरू मरतंय
दुष्काळ सारं घेऊन गेलाय
सरकार मदतीचा प्रयत्न(?) करतंय

शहरात राहायला जागा नाही
महागाई आकाशी झेप घेतीये
सामान्याने आवाज उठवल्यावर
सरकार मात्र धमकी देतंय

अहिंसेच्या गोंडस नावाखाली
सारा विद्रोह चिरडतय
लोकशाहीच्या घोषणा फक्त
सरकार हुकुमशाही चालवतंय

मंगळवार, २९ मे, २०१२

देशहितार्थ


कोणी म्हणतो शिवराय मोठा..
कोणी म्हणे माझा भिम मोठा
कोणासाठी फुलेच महात्मा
कोणासाठी शाहूच मोठा

कोणी स्वातंत्र्यवीरास नमितो..
कोणी महात्मा गांधीस मानतो..
कोणासही मानणारा असो तो..
दुसर्‍यास मात्र तुच्छ जाणतो..

प्रत्येकाचे दैवत मोठे..
दुसरे कुणी ठावेच नाही..
अश्या परिस्थिती या भारताचे..
भाग्य उजळणे शक्यच नाही...

उपाय यावर एकच आहे..
प्रत्येकाने स्वीकारण्याचा
जात-धर्म अन् पंथ सोडूनि
देशहितार्थ विचार करण्याचा...

सोमवार, १४ मे, २०१२

दुष्काळ... दोघांच्याही भाळी आहे..

दुष्काळ पडलाय..
राज्यात पाण्याचा..
अन् कवितेत शब्दांचा..

आठवताहेत निराळे रंग..
लोकांना मेघांचे..
अन् मला भावनांचे..

वाटेवर डोळे लागलेत...
बळीराजाचे पावसाच्या...
अन् माझे कवितेच्या..

गरज.. त्यांची अन् माझी..
थोडीशी निराळी आहे..
जगण्याचा प्रयत्न करणं मात्र..
दोघांच्याही भाळी आहे..

मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

अशी ही आमची पुण्याची मेट्रो..

पुण्यात मेट्रो करायचे ठरले..
पुढे मात्र रामायण घडले..
सर्वात आधी विरोध झाला..
"गरज काय?" हा सवाल आला...

आधी रस्ते करा नीट..
सुधारणा करा पीएमटीत...
रस्त्यात खड्डे झालेत फार..
त्यांचा आधी करा विचार..

या सगळ्यावर मात करत
मेट्रो थोडिसी पुढे सरकली..
मोजणी झाली, आखणी झाली..
मध्येच कुठेशी माशी शिंकली..

मेट्रो न्यायची नेमकी कुठून
यावरून चर्चा चालली आहे...
पुणेकरच काय पण या सार्‍याला
मेट्रोही आता कंटाळली आहे..
______________________मनस्वी...

बुधवार, ४ एप्रिल, २०१२

तो... मी

तो तिकडं सीमेवर
देशासाठी लढतोय..
मी मात्र इथे बसून
मैत्रीच्या गप्पा मारतोय...

तो तिथे काळ्या मातीत
राब राब राबतोय..
मी मात्र चव नाही
म्हणून अन्न टाकतोय..

तो तिथे रस्त्यावर उतरून
व्यवस्थेविरुद्ध झगडतोय..
मी मात्र घरात बसून
प्रगतीच्या चर्चा करतोय..

तो त्याचा स्वार्थ सोडून
माझ्यासाठी मरतोय...
मी मात्र संधी मिळताच
स्वतःचा स्वार्थ साधतोय..

शुक्रवार, २ मार्च, २०१२

दगड लांब फेकायचा तर,
हात मागे जावाच लागतो..

बाणाला गती द्यायची तर,
धनुष्य मागे ताणावाच लागतो..

दिवस उगवायचा असेल तर
रात्र व्हावीच लागते...

मोठी उडी घायची तर...
दोन पावले मागे जावेच लागते..

जीवनात यशस्वी व्हायचे तर..
या सर्वाची जाणीव ठेवावीच लागते..
Vinny
सुर्योदयाला ग्रहण लागले
म्हणून, सूर्याची आग कमी होत नाही...

काही फांद्या तूटल्या
म्हणून, झाड वाढायचे थांबत नाही..

एखादा घोळका निघून गेला
म्हणून, जत्रा काही उठत नाही..

माणूस थोडा थकला, बसला..
म्हणून, त्याचा प्रवास काही संपत नाही..

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

पिल्लू... लौकर ये.

A poem dedicated to all Mothers...
Who are waiting for their children to be back home...
Who are expecting a baby in their lives for a long time...
for those... who want to be a mother... But, destiny is not being kind with them...

GOD... PLEASE HELP THEM... :'(

एक चिउ वाट पाहतिये,
तिच्या हरवलेल्या पिल्लाची..
आठवण आहे तिला..
पिल्लू घरट्यातच ठेवल्याची..

सकाळी गेली तेव्हा
पिल्लू झोपलेलं होतं..
रात्रभर दंगा करून
तकलेलं होतं...

उठल्यावर त्याला भूक लागेल
हे चिऊला ठाऊक होतं.
त्याला खायला काय आवडेल
हे तिला माहीत होतं..

म्हणून चिउ गेली होती..
पिल्लुचा खाऊ आणायला...
खाऊ घेऊन ती परत आली..
लाडक्या पिल्लूला बघायला..

पण पिल्लू कुठेच दिसलं नाही..
शोधूनही सापडलं नाही...
आता चिउ उदास झालीय...
पिल्लू ला शोधून निराश झालीय...

पण तिला आशा आहे...
तिचं पिल्लू परत येईल...
आई म्हणून हाका मरेल...
पटकन चिउच्या कवेत शिरून..
तिच्यावर पोट भरून प्रेम करेल..

एक चिउ वाट पाहतिये,
तिच्या हरवलेल्या पिल्लाची..

पिल्लू... लौकर ये... येशील ना..
आई वाट पाहतिये रे..

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

गिरन चालू व्हती तरी
अंगावर कापड मिळालं न्हाय
गिरन जाउन जिंदगी गेली
पण घर काय मिळालं न्हाय

धरण बांधून वरसं लोटली
प्यायला पाणी मिळालं न्हाय
कालवा अंगण मोडून वाहिला
पण शेतापातुर पोचलाच न्हाय

नवीन प्रकल्प आला म्हनून
पुन्हा सरकार जिमीन घेतंय
वाचवायला गेला घर म्हणून
पोराचा माझ्या जीव घेतंय...

रविवार, १७ जुलै, २०११

संध्याकाळ... गर्दी...
धावपळ.. वाट शोधण्याची...
थोडी खरेदी... थोड्याश्या गप्पा...
थोडीशी घाई... घरी पोचण्याची...
रोजचाच रस्ता... तोच कोपरा.. .
तीच वेळ... परतीच्या प्रवासाची...
नेहमीचेच विचार... आजच्या दिवसाचे..
तीच काळजी.. येणार्‍या उद्याची...
सारे काही अगदी तेच... रोजचे..
अन् अचानक एक आवाज...
कानठळ्या बसणारा... धडाम्...
अन् मग... सुन्न...
डोळे दिपवणारा लोळ आगीचा..
सारे काही छिन्न विछिन्न..
उध्वस्त झालेला कोपरा... तोच आधीचा..
"वाचवा... धावा.. पकडा... उचला..."
त्याच हाका... तेच आवाज...
चिखल सारा... सार्‍या चौकभर...
रक्ताचा.. .मांसाचा... पाण्याचा..
कित्येक तुकडे... गाड्यांचे... माणसांचे..
अगणित प्रश्न... जिवंत राहिलेल्या मनांचे...
का? कोण? कधिपर्यन्त?
उत्तर... माहीत नाही....

बुधवार, १३ जुलै, २०११

१२ जुलै १९६१...

१२ जुलै १९६१... पानशेतच्या पुरानंतर पुण्यात काहीश्या अशयाच भावना असतील.. कित्येक मनांमध्ये..

शांतता... भयाण शांतता..
सारे काही उद्ध्वस्त झालेले..
चिखल सगळीकडे..
दगड मातीचा... अन् भावनांचा..
कित्येक मने.. भेदरलेली
सारे जीवन वाहून जाताना पाहिलेली..
क्षणात शून्य अनुभवलेली..
शून्य.. यातूनच आता सारे उभे व्हायचे होते..
करायचे होते..
इतके सारे होऊनही
कुठेतरी एक ठिणगी मात्र शिल्लक होती..
सार्‍या निराशेला जाळू शकणारी...
कष्टाच्या वणव्याने पुन्हा सारे निर्माण करू शकणारी..
एकाच ठिणगी..
ही ठिणगी पेटणार हे निश्चित..
कधी? कशी? कोण पेटवणार?
इतकाच काय तो प्रश्न..

रविवार, ३ जुलै, २०११

पाउस एकदाच येऊन जातो
धरती भिजवून जातो..
यंदा सोनं उगवणार
अशी आशा देऊन जातो...

मग शेतकरी कष्ट करतो,
धरणीमायचा ऊर फाडतो...
तिच्या काळजात अंकुरण्यासाठी
पुन्हा नवं बीज पेरतो...
अन् येऊन गेलेल्या पावसाची
परत येण्याची वाट बघतो..

पाउस काही येत नाही..
अंकुर काही फुटत नाही.
दरवर्षी होणारी निराशा
याही वर्षी चुकत नाही...

मग मात्र शेतकरी
पुन्हा एकदा हतबल होतो...
कुणाला काळ उचलून नेतो..
तर कोणी स्वतःच त्याच्या हवाली होतो...

बुधवार, १५ जून, २०११

उद्देश...

उद्देश... माझा.. जीवनाचा..
असा विचार केल्याला खूप काळ लोटलाय.
पण जेव्हा जेव्हा विचार केला..
तेव्हा तेव्हा त्यातून
वेगवेगळा निष्कर्ष निघाला..

कधी वाटले आपल्याला देवाने पाठवलंय
मस्तपणे भटकायला..
हवे तसे जगायला..

कधी वाटले..
छे मी तर आलोय इथे काही साध्य करायला..
काहीतरी खास..
जसे देवाने पाठवले अर्जुनाला..
त्या शिवरायला..
त्या शंभुराजाला...
त्या शाहूला..
फुले अन् आंबेडकरांना..

पण कधी कधी मी विचार करतो..
नक्की काय बरे हवे असेल देवाला..
माझ्याकडून?
खरेच कोणी सांगेल मला?
माझे धेय काय?
कोणी दाखवेल का वाट ??

पण मग.. अचानक वाटते..
कोण कशाला देवच सांगेल..
कसे?
त्याला जे हवे आहे ते समोर आणेल
आणि काहीतरी इशारा करेल..
बस्स.. तो इशारा समजायला हवा..
बाकी सगळे होईलच.. आपोआप...

ऊठ.. आणि तयार हो..

भविष्याच्या ही पुढे..
दिसते का कुणा?
गेलेली ती वेळ ..
परतुनी येते का पुन्हा?

मग..
येणार्‍याची काळजी करत..
गेलेल्याची आठवण काढत..
का जगावे एखाद्याने..
जगण्यासाठी वर्तमान दिलेय ना देणार्‍याने...

तो गेला, अमुक झाले,
थोडा विचार केला असता तर?
भेटेल का ती, होईल का हे..
जर असे झाले तर?

कधी पर्यंत चालणार असे?
जगाने सोडून, विचारात पडून,
का करून घ्यावे हसे?
मला वाटते.. वेळ आलीये..

ऊठ.. आणि तयार हो..
नव्या आव्हानांना तोंड देण्यास सज्ज हो..
विसरून भूत आणि भविष्य
जग वर्तमानाबरोबर..
बदलेल भूतकाळच तुझा..
येणार्‍या भविष्यकाळाबरोबर

वेड...

वेड चांदण्यांचे.. मला नव्हतेच कधी..
होते तर ते त्या चंद्राचे...
जो कधीच उगवला नाही..
मी आकाश न्याहाळताना

वेड नव्हते मला.. त्या गवतफुलांचेही...
होते तर ते त्या गुलाबाचे..
जो कधीच फुलला नाही..
मी बागेत रमताना

वेड तर नव्हतेच मला.. शिपल्यांचे ही..
होते तर ते त्या शंखाचे...
जो सापडलाच नाही कधी...
मी समुद्राकिनारी फिरताना...

वेड तर मला.. गर्दीचेही नव्हते कधी..
होते तर ते.. कोण्या दर्दिचे..
जो मला भेटलाच नाही..
मी जत्रेत शोधताना..
कदाचित.. .आता प्रवाहच उल्टा झालाय...
मी समजत होतो..
की सगळे येतील माझ्यासोबत..
चांगल्या गोष्टींसाठी मिळेल चांगली नौबत..
पण असे काहीच झाले नाही..
कारण मी प्रवाहाच्या विरुद्ध जाउ पहात होतो..
कोणालाच नकोय इथे शिवरायांच्या गोष्टी..
कोणालाच नकोय शंभू-शाहूशी दोस्ती..
हवाय फक्त प्रत्येकाला वेळ..
घालवण्यासाठी...
नकोय कोणालाच तो..
काही करून दाखवण्यासाठी..
कारण, प्रत्येकाचे आयुष्य
बिज़ी होत चाललाय..
प्रत्येकाचे मन
विरंगुळ्यासाठी क्रेझी झालेय..
सांगितले कुणा जर आठव तुझा इतिहास..
तर उत्तर मिळते..
वेळ नाहीए... बंद कर बकवास..
पण इतके करूनही
प्रत्येकाला शिवबाची ओळख हवी..
का ते माहीत नाही..
असे का होतेय काहीच कळत नाही..

आम्हीच राजे राहणार...

आम्ही मराठे.. मरहट्टे
राजे होतो.. राजे आहोत... या महाराष्ट्राचे...
अन्.. आम्हीच राजे राहणार...
स्वराज्यासाठी लढणार..
पण ते घडवण्यासाठी
थोडेही नाही वाकणार..
कारण आम्ही राजे
होतो आणि राहणार...
कष्ट कशाला करावे??
आहे तसेच राहावे...
जर कोणी दुसरा करू पाहील आमचे काम
तर त्याला शिव्या मात्र देणार..
कारण आम्ही राजे..
होतो.. आहोत.. आणि राहणार..
माय मराठीसाठीच झगडणार...
अगदी रक्त ही सांडणार...
पण त्या माय साठी आम्ही
घाम नाही गळणार..
कारण.. आम्ही राजे..
होतो, आहोत आणि
आम्हीच राजे राहणार...
पाउस का नाही पडत ?
मीच किती पाणी गाळायचे?.. रडत?
अगदी सुकून गेलेत तेही..
पाणी नाहीए.. डोळ्यातही..
पण हे देवाला कसे नाही कळत?

पाउस का नाही पडत ?

मी परत आलोय...

संध्याकाळ...
सूर्य... दिवसभर फिरून थकलेला
अगदी लालबुंद झालेला.
हळू हळू मावळू लागतो..
आणि.. अचानकच अंधाराला
नवा उन्माद चढू लागतो..
पुन्हा एकदा अंधाराचे साम्राज्य येते...
आणि अंधार आपला तो उन्माद,
माज सार्‍या जगतावर पसरवून टाकतो...
सार्‍या जगावर आपले सावट पसरवत..
अगदी निर्लज्जपणे त्याच्याच रंगाप्रमाणे..
किंबहुना त्याहूनही कृष्णवर्णीय कृत्ये करू लागतो...
आणि त्याला असे वाटू लागते...
बस्स... आता राहणार तो फक्त मीच...
कोण अडवणार मला?
कोण वाचवणार या जगास माझ्यापासून?
माझ्याच कवेत तर राहणार सगळे...
पण तेवढ्यात कुठून तरी
एक प्रकाश किरण येतो...
आणि त्या मागो माग...
अंधरावर मात करत...
पुन्हा.. सूर्य येतो...
अन् म्हणतो..
"या जगाचा उद्धार करायला...
मी आलोय....
होय... मी परत आलोय..."