प्रेमकविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमकविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१३

तुझ्या केसातून डोकावणारी
सांजेची सोनेरी किरणे....
अधुन मधून तुझे
केसांतून हात फिरवणे...

समोर वाहणारी निवांत
चकाकणारी नदी...
तिच्या प्रवाहातूनही
तुझ्याच प्रतिबिंबाची गर्दी...

रोज सूर्य मावळताना
मी अशीच स्वप्ने पाहतो...
खरी होतील न होतील
हे तुझ्यावर मी सोडतो...

- मनस्वी... 

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२


अचानक ती म्हटली मला..
"बरेच दिवस झाले...
तू असं छान काही लिहिलं नाहीस?
बरेच दिवस झाले...
शब्दांतून प्रेम व्यक्त केलं नाहीस?"

तिला म्हटलं...
"अगं सखे, वेळच कुठे मिळतो मला..
तुला न्याहाळत बसण्यातून?
तू समोर नसलीस,
की तुझी आठवणीत रमण्यातून...?"

तर म्हणाली...
"असं कसं?
पुर्वी तर करायचास की कविता..
अगदी माझ्या समोर बसून..
सुंदर शब्द गुंफायचास...
अन् माळायचास... त्यांचा गजरा करून.."

मी म्हटलो...
"आताही मी तेच करतोय...
पण तुलाच कळत नाहीये..
कविताच तर ऐकवतोय...
पण तुझंच लक्ष नाहीये..."

तेव्हा मात्र सखी, थोडी विचारात पडली..
अन् सारं उमगलं... तेव्हा पुन्हा गोड लाजली...

सोमवार, ४ जून, २०१२

पाउस... वाट पहात आहे..


तिला तो आवडला होता.. 
अगदी मनापासून.. 
अडचण एकच होती.. 
तिला.. त्याच्या मनातलं
माहीत नव्हता.. 


तसे तिने बरेच प्रयत्न केले...
त्याला आपलं मन कळावं,
तिच्या त्याच्यावरचं प्रेम..
त्याला दिसावं...
पण, यश काही मिळत नव्हतं..


एक दिवस अचानक
पाउस तिच्या मदतीला आला...
दोघेच सोबत फिरत असताना..
अचानक तिचा पाय घसरला..


त्याने तिला सावरलं..
अन् दोघांची नजरानजर झाली..
तोच क्षण होता..
जेव्हा तिच्या मनातल्या प्रेमाची..
त्याला प्रचीती आली..


पाउस असाच येत असतो..
आधून मधून..
अश्याच कोण्या दोघांच्या सोबतीला..
त्यांच्या मनातलं अव्यक्त प्रेम..
एकमेकांपर्यंत पोहोचवायला..


आता पुन्हा असेच दोघे..
कुठेतरी झुरत आहेत..
पाउस कदाचित त्यांच्या
बाहेर पडण्याचीच वाट पहात आहे.. 

बुधवार, २३ मे, २०१२

तरीही.. रात्र काळोखीच होती..


चंद्र उगवला..
बर्‍याच दिवसांनी..
तरीही रात्र काळोखीच होती..
तारे सारे खुशीत होते...
रात्र अजुनही दुःखीच होती..

एक चांदणी उतरून आली..
धरेवर काहीशी शोधू लागली..
तेव्हा तिला गमक उमजले..
रात्रीच्या दुःखाचे कारण समजले..

'त्याची' सखी अजुन आली नव्हती..
हे पाहून सृष्टी कोमेजली होती..
अन् म्हणूनच कदाचित...
चंद्र उगवला... बर्‍याच दिवसांनी..
तरीही.. रात्र काळोखीच होती..

मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

एक अनोखी रात..


चांदण्यांच्या चादरी खाली...
चंद्राची उशी करून..
चंदेरी प्रकाशात...
सखे, सजवुया आपली...
केवळ आपुलीच असणारी
एक अनोखी रात..

तुझ्या माझ्यात येणार्‍या
वार्‍यासही सांगू...
थोडासा लांबच राहा म्हणून...
क्षितीजापर्यंत चालत जाउ
एकमेकांचा हात धरून..

सार्‍या सृष्टीला वाटावा हेवा..
असा सजवु शृंगार...
येणार्‍या पहाटेसही
थोडी पाहायला लावू वाट...

सखे... अशी सजवुया आपली..
केवळ आपुलीच असणारी
एक अनोखी रात..

शनिवार, २१ एप्रिल, २०१२

आपुले प्रेमगीत

अवकाश केवळ डोळे मिटण्याचा
भेटशील तू तत्क्षणी मला...
अवकाश केवळ तू आठवण्याचा
पाहशील तुझ्याच मिठीत मला..

साद देशील मनातून जेव्हा
प्रतिसाद मिळेल प्रत्येकवेळी
अस्तणार नाही सूर्य, अपुल्या
भेटी अगोदर संध्याकाळी

चंद्रही मग आतुर होईल..
एक झलक तुज पाहण्यासाठी
सृष्टी सारी सज्ज होईलही
आपुले प्रेमगीत गाण्यासाठी..

मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

तुझ्या माझ्यातल्या अंतराला
सखी जरा सांग...
आजची एवढी रात्र
जरा बाजूलाच थांब...

सांग आज चंद्रालाही
कुठेसा फिरून जरा ये
चांदण्यातून तुझ्या या
थोडी उसंत आम्हा दे

आता सखे, थोडीशी तू
जवळी माझ्या ये...
उरलेल्या अंतरास या
मला आता संपवू दे...

मंगळवार, २७ मार्च, २०१२

नभांगणी तो चंद्र
चंद्राच्या सोबती तारे
चांदण्यात या सार्यांच्या
न्हाउन जाई जग सारे

चंद्राशी बोलणारी 'ती'
'तिच्याशी' बोलणारा चंद्र
दोघांना पाहण्यात तारे
होती क्षणार्धात धुंद

चंद्राशी बोलताना 'ती'
लाजरी होऊन जाते
अन् जाता जाता चंद्राचे
सारे तेज घेऊनी जाते.

सोमवार, २६ मार्च, २०१२

मोहिनी

सांजेचा वारा अन्
चंद्र नभाच्या अंगणी...
चंद्राच्या सोबतीला
चमकणारी चांदणी

चांदण्यात न्हायलेली
सारी सृष्टी चंदेरी झाली
अश्यातच कुठूनशी
सखी माझी आली...

सखीला पहिले मी
त्या चांदण्यात जेव्हा..
तिच्या सौंदर्याने मला
पुन्हा मोहिनी घातली..

मंगळवार, २० मार्च, २०१२

लाजणारे हे नयन तुझे
मज घायाळ करून जाती..
अबोल असूनही ओठ तुझे
मनीचे गुज सांगून जाती...

थरथरणारा स्पर्श तुझा
मज मोहवून जातो
धडधडणारा श्वास तुझा
मज अस्वस्थता देतो..

आकाशातही चंद्र-तारयांनी
चांदणे खुलत जाते...
आपुल्या भेटीमुळेच जणू ही
सृष्टी फुलत जाते...

बुधवार, १४ मार्च, २०१२

तिची प्रत्येक अदा

ती...
हसली की छान दिसते..
जणू चैत्राची पालवी फुटते..

ती...
रुसली तरी गोंडस दिसते..
गालांवर तिच्या गुलाब खुलते..

ती...
विचारात जेव्हा हरवून जाते..
सारे विश्व जणू थांबून राहते..

ती...
लाजते, मन मोहवून जाते..
मोगर्‍यासही नवा सुगंध देते..

तिची प्रत्येक अदा अशीच असते...
तिच्यासोबत सृष्टी छटा बदलते..

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

तिच्याबद्दल

तिच्याबद्दल बोलायला
इतका आतुर होतो मी..
कविता करायला बसलो,
की पहिला शब्द येतो.. "ती"

झोपी जाताना बाप्पानंतर
नाव तीचेच येते मनी..
झोपीगेल्यानंतरही
तीच भरून राहते स्वप्नि...

पहाट जाउन सकाळ येते
जागे होताना उन दिसते..
त्या किरणांतून तीच स्मरते..
नंतर सृष्टी दर्शन देते..

दिवसभराच्या कामातुनही
तीचाच विचार चालू असतो..
ती असली, नसली तरी. .
मी तिच्यातच बुडून गेलेला असतो..

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

रिमझिम पावसात ...

रिमझिम पावसात
वाट नागमोडी जाते..
तिला पाहताना मन
आठवणीत रमते...

याच वळणी वाटेच्या
भेट तिची झाली होती
तिला पाहताना माझी
झोप उडालेली होती..

हीच वाट होती साक्षी...
प्रेम वाढताना पहिलेली...
इथेच आम्ही एकमेकांना,
जन्माची वचने दिलेली..

आम्ही मांडीलेला खेळ
नियतीने उधळला
साता जन्माची गाठ
क्षणात तोडून गेला..

याच वाटेवर तिची
भेट शेवटची झाली..
तेव्हा अश्रूंच्या धारांनी
वाट झाली होती ओली...

भेट तुझी अन् माझी..

अस्ताला जाणारा सूर्य,
फेसाळणार्‍या लाटा...
रूपेरी वाळूचा किनारा
अन् सांजेचा मंद वारा...

अश्या सोनेरी सांजेला
भेट तुझी अन् माझी...
जणू, खलाळणार्‍या नदीचे
होते मिलन सागराशी...

विनायक बेलोसे

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

रात्रीचा रंग गहिरा,
चंद्राचा उजळणारा,
गारवा गुलाबी शिरशिरता
अन् तू, सुवर्ण जणू,

रात्र चंद्र गारवा अन् तू..
माझिया दुनियेतले
सप्तरंगी इंद्रधनू...

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

स्वप्नवत सृष्टी

तुझ्या रुपाची जादू ही सारी,
वाटे दुनिया मला ही न्यारी..
तुझ्या प्रेमानेच किमया केली
अन् ही रात्र चंदेरी झाली..

तुझ्या हासाच्या प्रेरणेने
ती नदीही खळाळू लागली,
तुझ्या स्पर्शाने मोहरून
रातराणी सुगंधून गेली..

तुझ्या प्रत्येक शब्दास सोबती
एक तारका चमकू लागली..
तुझ्या अस्तित्वानेचकेवळ
ही सृष्टी स्वप्नवत झाली...

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

"सखे, येशील ना तू?"

सखे, जन्म दिला होता तुला..
तोही उलटून गेलाय..
मी तिथेच उभा आहे..
अगदी तिथेच...
तो चंद्र बघ... विचारतोय हजारदा...
"कधीवर थांबणारेस...? किती वाट पाहणारेस?"
सर्व तारका एक एक दिवस साथ देऊन
आता संपून गेल्यात...
मला इथेच उभा पाहून
त्याही आता थकून गेल्यात..
पाउस, वारा तो सूर्य
सारे आता मला पुरता ओळखू लागलेत..
मला इथून हलवायचा प्रयत्न करून
तेही आता कंटाळून गेलेत..
मी मात्र तुझीच वाट पाहतोय..
तू येशील या विश्वासाने...
पुन्हा एकदा मला भेटशील...
डोळे भरून पाहीन मी तुला..
मन भरून गप्पा मारीन...
मगच कदाचित मी हलू शकेन इथून..
"सखे, येशील ना तू?"

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

तुलाच भेटण्यासाठी

जसा नभीच्या अंगणात
सडा चांदण्यांचा होता,
तसा माझ्या अंगणात
तुझ्या आठवांचा होता

रात्रभर यत्न मी
तुला शोधण्याचा केला,
चंद्रही कंटाळून मग
मावळतीला गेला

मी मात्र जागाच होतो
अखंड...
तुझ्या आठवणीत पडू दिला नाही
खंड...

पहाट झाल्यावर तरी
तू येशील असे वाटले
तुझ्या आठवणींचे धुके
सभोवती दाटले..

त्याचीच चादर करून
मग मी झोपी गेलो..
स्वप्नातही.. तुलाच भेटण्यासाठी

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

वाट पाहतो तुझी मी
अन् तो चंद्रही नभी झुरतो..
स्वप्नात तुझ्या मी असता
चंद्रही तयातच उतरतो...

तुझ्या येण्याला जेव्हा सखे
थोडासाही उशीर होतो
मन माझे होते बावरे
चंद्रही ढगाआड लपतो...

तुझ्या येण्याने सृष्टी खुलते.
चंद्रही उजळून जातो...
तू आल्यावर मला उमजते
चंद्र तुझ्याच रूपावर जगतो..

बुधवार, ६ जुलै, २०११

तूच येशी रोज स्वप्नि परि तुला मी सांगू कसा|
आणली होती सोनफुले तझ्याचसाठी भरूनी पसा||

पाहतो तुलाच पुन्हा मी पाहतो पहिल्यांदाच जसा|
घन बरसता आनंदतो चातक दरवेळी अगदी तसा||

नाजूक तुझी ही काया जणू अप्सारेचाच तुजला वसा|
सांग सखे मग तुझ्या कोमल तनुस मी स्पर्शू कसा||