गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

पुतळ्यांचे राजकारण...


देव... देणारा तो देव... पण तो मूलतः निर्गुण.. निराकार... कारण, ती एक मानसिक शक्ति वाढवणारी चेतना आहे... इतकंच...
ही शक्ति प्रथमपासूनच मानवाला खूप काही देत आलीय.... आणि मानवानेही त्याचा पुरेपूर फायदा करून मानवजातीचा विकास, प्रचार, प्रसार केलाय.. आणि याच सर्व गोष्टींसाठी त्या नैसर्गिक चेतनाशक्तीचे... पर्यायाने देवाचे आभार मानावे म्हणून म्हणून मनुष्याने त्या शक्तिला मूर्त रूप द्यायला सुरूवात केली..

हेच मूर्त रूप म्हणजे मूर्त्या देवाचे (त्या चेतनाशक्तीचे) सगुण साकार रूप मानले गेले.. मग, पुढे ज्या ज्या शक्तींमुळे मानवाला फायदा झाला त्यांचे स्वतःच्या कल्पनाशक्तीनुसार एक एक रूप तयार होऊ लागले.. याच सगुण रूपावर अभिषेक, पूजा असे काही उपचार करून मानवाने पुढे आपली देवांप्रतीची श्रद्धा व्यक्त केली..

पुराणकाळापासून ही प्रथा चालत आली आणि नंतर आपल्याला देणारा तो देव या नात्याने अनेक राजे, महाराजे, युगपुरूष यांची त्यांच्या जिवंतपाणी आणि त्यांच्या मृत्यूनंतर अशीच पूजा बांधण्याची प्रताच पडली.. राम, कृष्ण, शिव, विष्णू, खंडोबा, विट्ठल हे सारे त्याच परंपारेतून आले असावेत (असे मला वाटते).

त्याचबरोबर, संत मंडळींनीसुद्धा या पंक्तीत बर्‍याच प्रमाणात स्थान मिळविले. आणि हळूहळू प्रत्येक समाजात असे युगपुरूष देवाचे प्रातिरूप मानले जाऊ लागले. त्यांची पूजाअर्चा होऊ लागली. शिवरायांनासुद्धा याच पंक्तीत स्थान मिळाले. अर्थात, या सर्वांनी समाजासाठी केलेले कार्य महान होते आणि आहेच, यात काहीही शंका नाही.
आणि याच परंपारेतून पुढे सार्वजनिकरित्या या सर्व 'देवांना' सन्मान मिळावा, म्हणून देवळांची प्रथा पडली असावी. त्याचप्रमाणे युग-पुरुषांसाठी त्यांचे पुतळे, स्मारके बंधने सुरू झाले. आणि हेच पुतळे, स्मारके त्या त्या समाजाच्या अस्मितेची केन्द्र म्हणून उदयास येऊ लागली. याचाच परिणाम म्हणून आज प्रत्येक गावात त्या त्या गावातील मोठ्या व्यक्तिंची, युग-पुरुषांची, नेत्यांची स्मारके, पुतळे बांधले जाऊ लागले.

सुरुवातीला हे प्रमाण कमी होते, पण जसजसे गावांमध्ये 'विकासाचे' वारे वाहू लागले, गावांमध्ये पैसे येऊ लागले तसे पुतळे, स्मारके वाढु लागले आणि त्यांचे आकारसुद्धा. हे पुतळे बांधून आपल्या पूर्वजांचा, महापुरुषांचा, युग-पुरूष / स्त्रियांचा यठोचीत सन्मान होत असल्याची भावना लोकांमध्ये वाढत गेली आणि ती तशीच राहील अशी व्यवस्थाही करण्यात आली.

इथेच राजकारणी लोकांनी बाजी मारली. लोकांची श्रद्धा असलेल्या व्यक्तिंची स्मारके बांधून देणे, हे गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील इतर कामे करण्याहून अगदी सोपे काम असते. विकासकामे करण्यात बराच वेळ, पैसा खर्च होतो. अनेक लोकांचे हितसंबंध जपून ती कामे पूर्णत्वास नेणे खूपच जिकीरीचे काम असते. त्यापेक्षा गावाचा एकूण आवाका आणि तिथल्या समाजाचे स्वरूप पाहून एखादे स्मारक करणे सोपे.

त्यातूनही माणूस हा मुख्यतः भावनाप्रधान असतो. कोणत्याही गोष्टीवर मनुष्याची प्रथम प्रतिक्रिया ही नेहमी भावनाप्रधानच असते.
नंतर मग त्यावर विचार करून ती योग्य-अयोग्य ठरते. आणि विचार करून एखाद्या गोष्टीबद्दल बोलणे, त्यावर प्रतिक्रिया देणे, यासाठी त्या प्रत्येक गोष्टीचा, घटनेचा अभ्यास असावा लागतो. आणि तो प्रत्येकाला करणे शक्य होईलच असे नसते.. आणि म्हणूंच एकूण समाजाचा विचार करता, प्रत्येक समाज, 'समाज' म्हणून, भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याचीच शक्यता जास्त असते.
म्हणूनच कोणीही कितीही नाकारले, तरीही आपल्या महापुरुषांचा, नेत्यांचा, श्रद्धास्थानांचा झालेला मान-अपमान यांवर मनुष्य आपले मत ठरवत असतो. जो आपल्या श्रद्धास्थानांना यथोचित मान-सन्मान देईल, तो आपल्या जवळचा वाटू लागतो. आणि याची परिणती जात, धर्म, समाज, श्रद्धा या भावनांवर आधारित राजकारणात होते. आणि एका समाजाने यात उडी घेतली की हळूहळू नकळतच, इच्छे-अनीच्छेने प्रत्येक समाज यात ओढला जातो. त्यातून विटंबना, दंगली, पूजा-अर्चा, उत्सव या सर्व गोष्टींतून या सर्व समाजांचे ध्रुवीकरण केले जाते. आणि त्यातूनच सर्व राजकारण खेळले जाते. अर्थात काहीवेळा या राजकारणाचा त्या त्या समाजास तातपुरता उपयोग होतोही. पण, एक संपूर्ण मानवसमाज म्हणून जर या गोष्टीकडे पाहायचे असेल, तर सर्वांचेच नुकसान होणे हेच या राजकारणाचे भवितव्य ठरलेले असते.

सध्या महाराष्ट्रात अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीय. (देशात ती काही वेगळी नाहीच म्हणा). प्रत्येक समाजाने एकेका महा-पुरुषाचा त्यांच्या 'दैवत्वाचा' कैवार घेतला असावा असे काहीसे चित्र आहे. आणि म्हणूनच केवळ त्यांचे पुतळे बांधून आपल्या समाजाचा काहीतरी मोठा विजय होणार आहे, असा समाज सर्वच समाजांनी करून घेतलाय. म्हणूनच, एकीकडे पाण्याविणा लोक मारत असताना, गुरांना चारा नसताना, शेतकर्यांचे, सामान्य नागरिकांचे हाल होत असताना केवळ ही स्मारकेच जणू सर्वांना तार्णार आहेत, अश्या आविर्भावात सर्वच नेते लढताना दिसत आहेत. आणि दुर्दैव असे की, दुष्काळ, गरीबी अश्या गंभीर परिस्थितीमध्ये असलेल्या भागातच सर्वात जास्त लोक या स्मारकांसाठी झटताना दिसत आहेत. आणि याच अर्थाची आश्वासने देणार्‍या लोकांना जनता मतदान करत आहे.

एक-एक स्मारक बांधण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याची आश्वासने विविध नेत्यांकडून मिळत असताना, त्यापेक्षा आमच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवा, असे म्हणणारे लोक कमी आहेत. हीच मोठी शोकांतिका आहे. आणखी किती काळ लोक अश्या आश्वासानांना भूलणार आहेत याचे उत्तर काळच देईल हे निश्चित. परंतु, सध्य-परिस्थितीत महाराष्ट्रात जे चालू आहे त्यावर एकच उपाय दिसतोय, तो म्हणजे कोणीतरी जाब विचारणे. समाजाला या सर्व गोष्टी समजावून सांगणे, आणि समाजाकडून या गोष्टीला विरोध करवून घेणे. यापैकी प्रश्न विचाराने, आणि समाजाला जास्तीत जास्त समजवण्याचा प्रयत्न करणे हेच आपल्या हाती आहे. आणि हीच आजच्या काळाची खरी गरज आहे, असे मला वाटते.

- मनस्वी ((विनायक विश्वनाथ बेलोसे)
२० डिसेंबर २०१२