बुधवार, १० ऑगस्ट, २०११

गिरन चालू व्हती तरी
अंगावर कापड मिळालं न्हाय
गिरन जाउन जिंदगी गेली
पण घर काय मिळालं न्हाय

धरण बांधून वरसं लोटली
प्यायला पाणी मिळालं न्हाय
कालवा अंगण मोडून वाहिला
पण शेतापातुर पोचलाच न्हाय

नवीन प्रकल्प आला म्हनून
पुन्हा सरकार जिमीन घेतंय
वाचवायला गेला घर म्हणून
पोराचा माझ्या जीव घेतंय...

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

वाट पाहतो तुझी मी
अन् तो चंद्रही नभी झुरतो..
स्वप्नात तुझ्या मी असता
चंद्रही तयातच उतरतो...

तुझ्या येण्याला जेव्हा सखे
थोडासाही उशीर होतो
मन माझे होते बावरे
चंद्रही ढगाआड लपतो...

तुझ्या येण्याने सृष्टी खुलते.
चंद्रही उजळून जातो...
तू आल्यावर मला उमजते
चंद्र तुझ्याच रूपावर जगतो..