बुधवार, ३० मे, २०१२

सरकार


रस्त्यावरचं गरीब पोर
रोज उपाशीच झोपी जातंय
बेरोजगारीत वाढ होताना
सरकार विकासाच्या गप्पा मारतंय

पोट भरायला अन्न नाही
पाण्याविणा वासरू मरतंय
दुष्काळ सारं घेऊन गेलाय
सरकार मदतीचा प्रयत्न(?) करतंय

शहरात राहायला जागा नाही
महागाई आकाशी झेप घेतीये
सामान्याने आवाज उठवल्यावर
सरकार मात्र धमकी देतंय

अहिंसेच्या गोंडस नावाखाली
सारा विद्रोह चिरडतय
लोकशाहीच्या घोषणा फक्त
सरकार हुकुमशाही चालवतंय

मंगळवार, २९ मे, २०१२

देशहितार्थ


कोणी म्हणतो शिवराय मोठा..
कोणी म्हणे माझा भिम मोठा
कोणासाठी फुलेच महात्मा
कोणासाठी शाहूच मोठा

कोणी स्वातंत्र्यवीरास नमितो..
कोणी महात्मा गांधीस मानतो..
कोणासही मानणारा असो तो..
दुसर्‍यास मात्र तुच्छ जाणतो..

प्रत्येकाचे दैवत मोठे..
दुसरे कुणी ठावेच नाही..
अश्या परिस्थिती या भारताचे..
भाग्य उजळणे शक्यच नाही...

उपाय यावर एकच आहे..
प्रत्येकाने स्वीकारण्याचा
जात-धर्म अन् पंथ सोडूनि
देशहितार्थ विचार करण्याचा...

आता... नक्कीच येईल तो...


कैक दिवस झाले..
त्याची भेट होऊन..
आता जीव थकून गेलाय
त्याची आठवण काढून...

आता येईल तो..

त्याच्या अनुपस्थितीत
खूप काही बिघडलंय..
आता त्याचीच आस आहे..
त्याच्याविना सारं अडलंय..

आता येईल तो..

तो आला..  की सारे जग
पुन्हा प्रफुल्लित होईल...
तो आला... की सारी सृष्टी
सगळे दुःख विसरून जाईल..

आता... नक्कीच येईल तो...

शुक्रवार, २५ मे, २०१२


कधी? काय? कुठे? कसे?
प्रश्न असतात तरी किती असे?
अशी काय जादू यांची..
उत्तरातूनही नवा प्रश्न दिसे...

का कोणास ठाऊक
अचानक आकाश भरून आलं...
लख्ख ऊन पडलेलं असताना
अचानक अंधारून आलं..

जोमाचा वारा सुटला..
सारा पाचोळा उडवून गेला...
घोंघावत अवकाशी पोचला
मग अचानक शांत झाला..

मेघ जमलेले जणू चिडलेले
गडगडात मोठा झाला..
संघर्षातून त्या मेघांच्या
वीजेचा लोळ धरेवर आला..

मेघ फाडून मग जेव्हा
पाऊस बरसत उतरला
सृष्टीच्या भयाणतेतून
जणू आनंद बहरू लागला..


एक वाहता निर्झर
किरर्रता भयाण सोबती
पाचोळ्यात होई सळसळ..
अन् एक किंकाळी... अजाणती

कोणास लपवतो आडोसा
कोणाचे हास्य ते भेसूर...
वणवा लागतो कुठेसा..
आसमंती दाटला धूर...

झाकोळला तो सूर्य...
अंधार दाटूनी येतो..
उरातले चोरूनी धैर्य..
केवळ भीतीच देऊनी जातो..

बुधवार, २३ मे, २०१२

तरीही.. रात्र काळोखीच होती..


चंद्र उगवला..
बर्‍याच दिवसांनी..
तरीही रात्र काळोखीच होती..
तारे सारे खुशीत होते...
रात्र अजुनही दुःखीच होती..

एक चांदणी उतरून आली..
धरेवर काहीशी शोधू लागली..
तेव्हा तिला गमक उमजले..
रात्रीच्या दुःखाचे कारण समजले..

'त्याची' सखी अजुन आली नव्हती..
हे पाहून सृष्टी कोमेजली होती..
अन् म्हणूनच कदाचित...
चंद्र उगवला... बर्‍याच दिवसांनी..
तरीही.. रात्र काळोखीच होती..

सोमवार, २१ मे, २०१२

ओढ..


अमावस्येला चंद्र नसतो..
मी मात्र तिथेच जाउन बासतो...
पौर्णिमेचा चंद्र...
मी जिथून न्याहाळत असतो...

अंधार असतो भरून आलेला..
चांदण्या सजुन आलेल्या...
चंद्र नसतानाही माझ्या नजरा...
चंद्राकडेच लागलेल्या...

माहीत असता.. चंद्र येणार नाही..
तरीसुद्धा मला
काहीच फरक पडत नाही..
कारण, माझी चंद्राबद्दलची ओढ..
तिथीनुसार बदलत नाही...

सोमवार, १४ मे, २०१२

दुष्काळ... दोघांच्याही भाळी आहे..

दुष्काळ पडलाय..
राज्यात पाण्याचा..
अन् कवितेत शब्दांचा..

आठवताहेत निराळे रंग..
लोकांना मेघांचे..
अन् मला भावनांचे..

वाटेवर डोळे लागलेत...
बळीराजाचे पावसाच्या...
अन् माझे कवितेच्या..

गरज.. त्यांची अन् माझी..
थोडीशी निराळी आहे..
जगण्याचा प्रयत्न करणं मात्र..
दोघांच्याही भाळी आहे..

गुरुवार, ३ मे, २०१२


मन की गहराइयाँ हो समुंदर से ज़्यादा,
कल्पनाओंकी उँचाई आसमाँसे उँची||
धड़कनें हवाओंसे आगे जाती हुई,
अरमानोंसे थरक रही हैं भूमि||
ऐसी हो अगर किसी की दीवानगी,
तो मंज़िलोको पाना मुश्किल नहीं होता||
मंज़िले तो खुद सामने आ जाती हैं,
चल कर मंज़िलोंतक जाना ज़रूरी नहीं होता||