मंगळवार, २७ मार्च, २०१२

मी... "मनस्वी"

मी लिहीत जातो शब्द
भाव दाटतात मनी जेव्हा
फिकीर नसते मजला
यमकांच्या जुळण्याची तेव्हा

मी मांडत जातो स्वप्ने
जी दिसती मज डोळ्यांना
मृगजळच केवळ सारी
वाटुदेत मग ती कोणा

जे मनास माझ्या वाटे
मी तसाच व्यक्त होतो
म्हणून तर मी आता
माझे नाव "मनस्वी" घेतो
नभांगणी तो चंद्र
चंद्राच्या सोबती तारे
चांदण्यात या सार्यांच्या
न्हाउन जाई जग सारे

चंद्राशी बोलणारी 'ती'
'तिच्याशी' बोलणारा चंद्र
दोघांना पाहण्यात तारे
होती क्षणार्धात धुंद

चंद्राशी बोलताना 'ती'
लाजरी होऊन जाते
अन् जाता जाता चंद्राचे
सारे तेज घेऊनी जाते.

सोमवार, २६ मार्च, २०१२

कवी ग्रेस

कवी ग्रेस गेले...
त्यांच्या जान्याने माझ्या मनीच्या भावना त्यांच्याच एका गाजलेल्या कवितेला स्मरून इथे व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...

'तो' गेला सोडूनि सर्वांना
तेव्हा सूर्य तापला होता..
'त्याच्या' जाण्याच्या दुःखाने
सार्‍या दुनियेवर कोपला होता

'तो' सार्‍यांना देऊन गेला
नवदृष्टी जग पाहण्याची..
'तो' निर्माण करून गेला
पोकळी कधी न भरणारी...

'तो' बोलत होता काही
समजलेच नाही कोणी
'त्याने' इतके देऊनीसुद्धा
रिकामीच आपुली झोळी
--------------------------- विनायक बेलोसे

मोहिनी

सांजेचा वारा अन्
चंद्र नभाच्या अंगणी...
चंद्राच्या सोबतीला
चमकणारी चांदणी

चांदण्यात न्हायलेली
सारी सृष्टी चंदेरी झाली
अश्यातच कुठूनशी
सखी माझी आली...

सखीला पहिले मी
त्या चांदण्यात जेव्हा..
तिच्या सौंदर्याने मला
पुन्हा मोहिनी घातली..

मंगळवार, २० मार्च, २०१२

एक मुलगी... आपल्या भावी जीवनसख्याबद्दल असाच काहीसा विचार करत असेल... नाही का?

तुझीच स्वप्ने पाहत होते,
तुझ्याच विचारात मी गुंग होते..
मज स्वप्निच्या राजकुमारा,
वाट तुझीच मी पाहत होते..

कसा असशील तू... कसा दिसशील तू...
भेटशील तेव्हा काय बोलशील तू..
कित्येक आहेत प्रश्न मनी माझ्या...
त्यांना उत्तर काय देशील तू...

आलास तू सामोरा जेव्हा..
वाटले स्वप्न पूर्तता झाली..
इच्छा माझिया मनातलीच
मूर्ती होऊनि समोर आली..
लाजणारे हे नयन तुझे
मज घायाळ करून जाती..
अबोल असूनही ओठ तुझे
मनीचे गुज सांगून जाती...

थरथरणारा स्पर्श तुझा
मज मोहवून जातो
धडधडणारा श्वास तुझा
मज अस्वस्थता देतो..

आकाशातही चंद्र-तारयांनी
चांदणे खुलत जाते...
आपुल्या भेटीमुळेच जणू ही
सृष्टी फुलत जाते...

गुरुवार, १५ मार्च, २०१२

खरे शिवस्मारक कोणते?

सिंधुसागरातील एक भव्य पुतळा की मराठी मुलुखातील किल्ले?

२००४च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी मुंबईजवळ सिंधुसागरात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांचे शासन आल्यावर त्यांनी कामही सुरू केले.
स्मारकाचा आराखडा तयार झालाय.
महाराजांचे हे स्मारक अगदी अमेरिकेच्या लिबर्टीच्या पुतळ्याहूनही उंच असणार आहे.
इथे महाराजांच्या जीवनावर आधारीत एक प्रदर्शन, तसेच एक खास कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.
एकूणच हे स्मारक सिंधुसागरात सुंदर दिसेल. हे निश्चित...
परंतु, या सर्वांहूनही मोठा एक प्रश्न पडतो.. तो असा की महाराजांच्या स्मृतिसाठी काही करावयाचे असेल, त्यांचा खरा सन्मान करायचा असेल, तर या स्माराकाहूनही भव्य काहीतरी करायला हवे.

त्यासाठीच काही मुद्दे खाली देत आहे...
* आता जागा निश्चिती होत असताना आणि याच स्मारकावर ३५० कोटी खर्च होतील असे सांगण्यात येत आहे.
* एकूणात आपल्याकडील विविध योजना कश्या राबवल्या जातात ते पाहता, हाच खर्च, हे स्मारक पूर्ण होईपर्यंत यावर अंदाजे १५०० कोटी रुपये खर्च होईल, हे नक्की.
* स्मारक पूर्ण झाल्यानंतर, इथे येणारे पर्यटक आणि शिवभक्त यांना महाराजांबद्दल आदर वाटेल, वाढेल हे निश्चित. परंतु, इथे किती लोकांना रोजगार मिळेल हा विचार करायला हवा.
* हे स्मारक बांधताना समुद्रातील पर्यावरणाचाही विचार करणे तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते.


शिवाजी महाराजांचे कार्य हे पुतळा, स्मारक बांधून नव्हे, तर त्यांनी ज्या क्षेत्रात, मराठी मुलुखात काम केले, ज्या किल्ल्यांवर ते राहीले, त्या सर्व जागांचे, तिथल्या विविध गोष्टींचा अनुभव घेऊन जास्त समजू शकते.
आता या सर्वांचा अनुभव लोकांना व्हावा म्हणून काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

* महाराष्ट्रातील काही (साधारण ३० - ५०) महत्वाचे, मोठे, ऐतिहासिक, शिवकालीन किल्ले निवडावेत.
उदाहरणार्थ, तोरणा, राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, पुरंदर, पन्हाळा, प्रतापगड, सज्जनगड (हीच नावे असावित असे नाही, यात बदल असु शकतो..)
* या प्रत्येक किल्ल्यावरचा शिवकालीन इतिहास काय, त्यावेळीची एकूण परिस्थिती, वातावरण, काय होते याची माहिती जमवावी.
* त्या किल्ल्याच्या अखत्यारीतला मुलूख कोणता, प्रदेशातील इतर किल्ले कोणते याची माहिती जमवावी.
* त्या किल्ल्यावर त्या काळी साधारण काय काय इमारती अस्तित्वात होत्या, कोणत्या वाटा त्यावेळी वापरात होत्या त्या निवडाव्यात.
* या सर्व वास्तू, त्यांच्या मूळ स्वरूपला धक्का न लावता पुन्हा कश्या उभ्या राहू शकतील यासाठी प्रयत्न करावेत.
* वर जाणार्‍या वाटा चांगल्या बांधून काढाव्यात.. .(गाडीरस्ता न करता.. कारण, एकदा तिथे गाड्या पोहोचल्या की तिथल्या मूळ स्वरूपास् हानी पोहोचण्याची शक्यता खूपच वाढते.)
* पर्यटकांना राहण्याची सोय होईल अशी व्यवस्था करावी.
* त्यांना इथला इतिहास समजावून सांगण्यासाठी, किल्ला दाखवण्यासाठी काही युवकांना प्रशिक्षित करावे.
* किल्ल्यावर ठीकठिकाणी माहितीफलक लावावेत.

या सर्व गोष्टी करताना, किल्ल्याचे मूळ स्वरूप चांगले राहील याची दक्षता घेण्यात यावी, इथली स्वच्छता, पावित्र्य चांगले राहावे म्हणून प्रयत्न व्हावेत.

या सर्व गोष्टी करण्यासाठी, प्रत्येक किल्ल्यास साधारण १० कोटीचा निधी खर्च झाला तरी साधारण ३०० - ५०० कोटी रुपये खर्च करून, खूप काही साआध्य करता येईल.

* स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.
* लोकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येईल.
* शिवाजी महाराजांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवता येईल.
* या सर्व किल्ल्यांचा विकास करण्याच्या निमित्ताने आसपासच्या काही गावांचाही विकास साध्य करता येईल.
* याच किल्ल्यांच्या आसपासच्या मुलुखातील इतर प्रेक्षणीय स्थळेही त्या योगे लोकांना दाखवता येतील.

याचप्रमाणे, आणखी काही फायदे होतीलच..

शेवटी इतकेच वाटते, हे सारे जर झाले, तर शिवाजी महाराजांच्या नीतीनुसारच जास्तीत जास्त लोकांचा, रयतेचा फायदा होऊ शकतो, हे नक्की...

कृपया आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात..

बुधवार, १४ मार्च, २०१२

तिची प्रत्येक अदा

ती...
हसली की छान दिसते..
जणू चैत्राची पालवी फुटते..

ती...
रुसली तरी गोंडस दिसते..
गालांवर तिच्या गुलाब खुलते..

ती...
विचारात जेव्हा हरवून जाते..
सारे विश्व जणू थांबून राहते..

ती...
लाजते, मन मोहवून जाते..
मोगर्‍यासही नवा सुगंध देते..

तिची प्रत्येक अदा अशीच असते...
तिच्यासोबत सृष्टी छटा बदलते..

शुक्रवार, २ मार्च, २०१२

दगड लांब फेकायचा तर,
हात मागे जावाच लागतो..

बाणाला गती द्यायची तर,
धनुष्य मागे ताणावाच लागतो..

दिवस उगवायचा असेल तर
रात्र व्हावीच लागते...

मोठी उडी घायची तर...
दोन पावले मागे जावेच लागते..

जीवनात यशस्वी व्हायचे तर..
या सर्वाची जाणीव ठेवावीच लागते..
Vinny
सुर्योदयाला ग्रहण लागले
म्हणून, सूर्याची आग कमी होत नाही...

काही फांद्या तूटल्या
म्हणून, झाड वाढायचे थांबत नाही..

एखादा घोळका निघून गेला
म्हणून, जत्रा काही उठत नाही..

माणूस थोडा थकला, बसला..
म्हणून, त्याचा प्रवास काही संपत नाही..