सोमवार, २ जुलै, २०१२


चार पावलं मागं यावं..
कुण्यातरी आपल्यांसाठी..
अन् मग जाणीव व्हावी..
आपण एकटेच मागे पडल्याची..

अश्यावेळी आपण पुन्हा
त्यांना गाठण्याची धडपड करतो..
परंतु, कित्येकवेळा शेवटी..
आपण.. काही क्षणांनी मागेच राहतो..

समजत नाही.. उडी घ्यावी सरळ..
पुढे जाण्यासाठी..
की वाट पाहावी..
कोणीतरी.. मागे वळून पाहण्याची..

पुढे जाण्याच्या प्रयत्नात
कधी आपण पुढेच निघून जातो..
काहीच केलं नाही..
तर कायमचे मागे राहतो..

नात्यांच्या या खेळात
आपण इतके गुंतून जातो..
की हा गुंता सोडवण्याआधीच..
आपला.. वेळ संपतो..


रात्र... अंधार...
किरर्र.. घनदाट..
त्यातून जाणारी
एक नागमोडी वाट..

धुकंच धुकं सर्वत्र..
ना दिशा.. ना वेळ..
कशाचाच जमेना..
कशाशीही मेळ....

आसपास कोणाची
चाहूल तेवढी येते..
पण, सोबत केवळ..
भीतीच सोडून जाते..

अचानक एक किंकाळी..
मग पुन्हा.. शांतता...
हृदयात वाढणारी धडधड..
अन् मेंदूत सुन्नता..

पुन्हा पुन्हा एकच विचार..
पुढे नक्की होणार काय...
अन् तेवढ्यात जाणवतो..
कशात तरी अडकलेला पाय...

हाच आहे तो शेवट..
खात्री पटलेली असते..
या वेळची किंकाळी..
आपल्याच आतून आलेली असते..


एक क्षण... शेवटचा..
मृत्यू येण्याआधीचा..
प्रत्येकाच्या आयुष्यात येऊनही..
कोणालाच ठाऊक नसलेला..

कधी तो क्षण कधी येईल..
याची चिंताच कोणाही नसते
कधी केवळ.. त्याच्याच येण्याची..
वाट पाहण्याची ओढ वाटते..

कोणीही कसंही वागत राहो..
तो क्षण तर येणारच असतो..
आपल्या हाती केवळ..
त्या क्षणापर्यंतच वेळ असतो..


आजचा सूर्य मावळेल..
पुन्हा कधीही न उगवण्यासाठी..
आज रात्र होईल...
पुन्हा कधीही न संपण्यासाठी..

उगवलाच उद्याचा दिवस..
तर, तो केवळ भास असेल..
सारे काही तसेच असेल..
तरीही एक पोकळी असेल..

कोणाला बहुदा समजेलही..
पोकळी झालेली जाणवेलही..
पण त्यामागचे कारण काय..
हे शोधायचाही वेळ नसेल..

पुन्हा काही नवीन घडेल..
पोकळी नकळत भरून जाईल..
जुने मात्र पुन्हा एकदा..
नेहमीप्रमाणे.. विस्मरणात जाईल..

शब्दांना काय...
त्यांना कोणीतरी हवंच असतं...
त्यांना व्यक्त करणारं..
स्वतःच्या मनातल्या भावना..
त्यांच्या सोबतीनं मांडणारं...

आपण फक्त स्वतःहून
चार पावलं पुढं व्हावं..
शब्द निवडतातच आपल्याला..
मग आपण त्यांना घेऊन..
त्यांच्याशी खेळून...
असंच पुढे चालत जावं. .

शब्दांना मग आठवण राहते..
आपल्या सोबतीतल्या गमतीची... .
मग ते शोधत राहतात..
आपल्याला..
बनवायला.. वाट.. व्यक्त होण्याची...