शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

कुंपण...

प्रत्येक मनाला
एक काटेरी कुंपण असतं...
ते कधी ओलांडता येत नाही ...
मन कुठेही गेलं
तरी कुंपण त्याला सोडत नाही..
मनाला ते सांगत राहतं..
मर्यादा त्याची दाखवत राहतं..
पण, मन मात्र ऐकत नाही..
कुंपणाकडे पहात नाही..
कुंपण मग ईरेला पेटतं..
मनाला उडूच देत नाही..
कधी मन, कुंपण तोडतं... उंच उडतं....
मग त्याला वाटू लागतं..
की, कुंपणाशिवाय जगता येतं..
पण, त्याहून शहाणं असतं...
हळूच मनाच्या नकळत..
मनाला नव्यानं मिठीत घेतं...

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

प्रेमास भरती येते...

ती कुशीत शिरली
की तो खुलतो..
त्याने मिठी घट्ट केली
की ती आनंदून जाते...

तिच्या एका नजरेत
तो घायाळ होतो..
त्याच्या स्पर्शाने
ती मोहरून जाते..

तिच्या चुंबनाने
तो शहारुन उठतो..
त्याच्या सहवासात
ती हरवलीशी होते..

रातराणी सुगंधते
रात मोहमयी करते..
चंद्र पूर्णत्वा येतो
प्रेमास भरती येते...

मोठं ध्येय गाठण्यासाठी...

फुलपाखरू...
किती सुंदर, किती नाजूक...
अगदी अलगद हळूवार उडणारे..
कितीतरी इतर पाखरांसोबत..
स्वछन्दी आयुष्य जगणारे...
पण तरीही सतत
एकाच मर्यादेत राहणारे..
तीच साथ, तोच परिसर...
जीवनसुद्धा अगदी...
काही दिसभर...
म्हणूनच कदाचित..
आपल्याला फुलपाखरू व्हावंसं वाटतं...
मनाप्रमाणे उडत राहून..
केवळ आनंदी राहावं वाटतं...
पण, त्या नादात विसरतो आपण..
उंच उडायला फुलपाखरू नव्हे..
तर, गरूड व्हावं लागतं..
मोठं ध्येय गाठण्यासाठी...
पंखांमध्ये मोठं बळ असावं लागतं..

कधीवर चालायचे???

पौर्णिमेचा चंद्र पाहुनि केवळ..
कधीवर मी झुरायचे?

गोजिर्‍या मुखड्यास कधीवर...
चंद्रबिंबात शोधायचे?

अमावस्येच्या रात्रीपरि
अंधारास मी पाहायचे...

चांदण्यांच्या वाकुल्यांना
शांततेने सहायचे..

सखे, हे असे सारे, सांग मजला...
कधीवर गं चालायचे???

तिरंगाच आहे...

रंग मनाचा माझ्या
भगवाच आहे...
किंवा तुझ्या मनाचा हिरवाच आहे...
कोण्या एकाचा तो निळाच राहावा...
आणखी कोणा एकाचा पांढराच आहे....
प्रचार आणि प्रसार सध्या
असाच आहे..
प्रश्न नसे असा की.
कोण करे हा प्रसार
अन् कोण करे विरोध त्याला..
प्रश्न असा की नक्की
खरा कोण आहे..
विचार करता परंतु,
येते ध्यानी..
या सार्‍याहूनही...
रंग आपुला वेगळाच आहे..
मनास विचारिता समजते...
नसे हा रंग अजिबात निराळा...
रंग हा तिरंगाच आहे...