तजेलदार चहा प्यायची तल्लफ आली आणि सकाळी सकाळी बाहेर पडलो....
बाहेर पडताच लक्षात आले, "आज थंडी वाढलीय बरं!".
एवढंच फक्त मी आमच्या हिला म्हटलो.. बाहेर पडता पडता... तर म्हटली... "थांबा जरा"...
विचारले तिला.. "काय गो अचानक थांबा म्हटलीस ते?"
तेवढ्यात आत जाउन पटकन तिने स्वेटर आणला आणि माझ्या हातात दिला...
म्हणाली, "स्वेटर घालून जा... उगाच सर्दि व्हायची नाहीतर... "
तिला म्हटले.. "अगो वेडे मी आजवर कधी स्वेटर वापरलाय का?"
तर म्हणते कशी, "अहो, पण घाला आता... आपलं वय झालंय.. पूर्वीसारखी तब्येत साथ द्यायची नाही हो..." तरीही हट्ट करून मी स्वेटर ना घेता तसाच बाहेर पडलो...
घरासमोरच असलेल्या सोसायटीच्या बागेत थोडावेळ बसून मग पुढे जऔ असे काहीसे वाटले आणि सरळ बागेत शिरलो... बागेत जाताच जाणीव झाली.. हवेतल्या धुक्याने केलेल्या जादूची...
गवताच्या प्रत्येक पानावर त्याने एक एक थेंब जणू अगदी अलगद ठेवून दिला होता...
स्पर्श होताच ते दवबिंदू अगदी अंगाशी सलगी करून, हळूच ओघलून खालच्या गवतात पुन्हा मिसळून जात होते. आणि एक सुखद गारवा अगदी नसा-नसात भिनवत होते. मग काय.. चप्पल काढून हातात घेतली आणि तसाच अनवानि चालू लागलो.
हलू हलू गारवा वाढत होता. थोडीफार थंडी बोचू लागली. तरीही मी तसाच पुढे चालत होतो...
बागीचा संपला आणि पुढे रस्त्यावरची टपरी दिसली. परंतु, मला मात्र आता रस्थयापलीकडाची टेकडी खुणावत होती. धुक्याची चादर लपेटून अंगावरच्या हिरव्यागार वनराईमुळे सुखावलेली...
परत येताना चहा घेऊ म्हणून सरळ टेकडीवर चढून गेलो. आज वारा काय मस्त सुटला होता..
त्यातून ही मस्त धुक्याची चादर... काय सुंदर वातावरण आहे. पण आजचा वारा काही वेगळाच..
पुर्वी मी अश्या वार्यात तासन्-तास बसून राहायचो.. पण आज काही हा मला सोसवत नव्हता..
म्हणून काहीश्या अनीच्छेनेच मी घराकडे परतु लागलो.. येताना कोणत्यातरी विचारात इतका गुंग झालो..
की सरळ दारात येऊन थांबलो... बेल वाजवतच होतो, तेवढ्यात एक शिंक आली..
झाले... शिंक आली.. आणि मागून आमची ही आली... "काय हो आलात? आत्ताच झाडांना पाणी घातले.. आणि हे काय? शिन्कताय? तरी सांगितले होते तुम्हाला.. स्वेटर घेऊन जा.. पण ऐकनार नाही... चला आत... एक चहा करून देते आल्याचा... तो घ्या आणि झोपा शांत.. बरं वाटेल जरा..."
मग काय बसलो वाट बघत चहाची... चहा घेतला आणि स्वेटर घालून गॅलेरीत येऊन बसलो...
तेवढ्यात आमचे शेजारी बागेतून येता येता म्हटले... "काय हो, आज गॅलेरी? काय करताय?"
"काही नाही... तजेलदार चहा पितोय... आमच्या हिच्या हातचा..."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा