शुक्रवार, २० मे, २०११

भेट अनोळख्या मैत्रीची...

"चल रे... मी निघतो... ३ ची ट्रेन पकडायचीये मला... "
"अरे.. पण घाई काय आहे? थांब जरा.. जाशील आरामशीर.. एकच का ट्रेन आहे?"
भाउ म्हटला... पण मला मात्र कोणत्याही परिस्थितीत तीच ट्रेन पकडायची होती.. त्याला कारणही खास होते म्हणा..
बर्‍याच दिवसांनी मला "ती" भेटणार होती... बर्‍याच दिवसांनी म्हणजे खरे तर पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेटणार होती..
आमची ओळख काही कामानिमित्त झालेली.. पण ती केवळ तितकीच ना राहता मैत्रीत बदललेली... पण प्रत्यक्षात भेट नाहीच.
कधी फोनवर बोलून तर कधी एसएमएसवरुन... कधी नेटवरून असे आमचे बोलणे चालायचे.. अगदी नियमितपणे.. पण दोघे वेगवेगळ्या ठिकाणी... त्यामुळे भेटण्याचा योग कधी नाही आला.. पण म्हणून आम्हाला काही वाईट वाटत नव्हते आणि काही अडतही नव्हते... संपर्कासाठी इतकी साधने होतीच ना...

असेच काही दिवस गेले आणि मग मात्र वाटू लागले... एकदा तरी भेटावं.. ज्या व्यक्तीशी आपण इतके बोलतो.. खूपकाही शेअर करतो, त्या व्यक्तीला एकदा तरी भेटावं असं वाटायला लागलं.. आणि योग जुळून आला.. असे क्वचितच होत असावे.. आपल्याला काही हवयां अन् लगेच योग जुळून यावा आणि आपल्याला हवे ते मिळावे... तसंच झालं...

ती येणार होती माझ्याच शहरात... काही कामानिमित्त... मग ठरवले.. तिला भेटायचे... पाहायचे.. मस्त गप्पा मारायच्या.. तिला मला माहीत असलेल्या गोष्टी बोलायच्या... धमाल करायची.. पण काही केल्या ते जमेल असं वाटत नव्हतं.. कारण, ती जास्त वेळ थांबणार नव्हती... आता काय? ती येणार.. काम करणार आणि लगेच परतणार... यात भेट कशी जमवायची?

मग एक उपाय शोधून काढला... प्रवासातच तिला भेटलो तर? कल्पना उत्तम.. पण खूप घाई करावी लागेल.. ट्रेनचे तिकीट.. नेमकी तीच ट्रेन.. परतीचा प्रवास. सगळ्या गोष्टी जमवव्या लागणार होत्या.. पण आता ठरवलंच आहे भेटायंच तर एवढं करायला हवंच ना... विचार पक्का केला.. पण "तिला" सांगू? की ना सांगताच जाउ भेटायला?.. सरळ सांगून टाकुयात... पण नको थोडी गंमत करू.. सांगायलाच नको.. थेट जाउन भेटू...

तिला साधारण विचारले कधी येणार आहेस, किती वेळ आहेस, नेमकी कशी येणार जाणार वगैरे... आणि तसेच बुकिंग केले गाडीचे.. वाटेतच माझे गाव होते.. म्हणून मग ठरवले, तिच्यासोबत जायचे आणि तसेच गावी उतरून मग घरी यायचे.
*
भावाच्या घरातून निघालो... स्टेशनला जाईपर्यंत मनात अनेक विचार येत होते.. अक्षरशः विचारांचे वादळ उठलेले मनात... ती कशी दिसत असेल... मला ओळखेल का?... बोलेल का माझ्याशी? तिची पहिली प्रतिक्रिया काय असेल? कशीही असो.. एकदा भेट तर नक्कीच व्हावी.. हे सगळा चालू असतानाच अचानक फोनची रिंग वाजली... तिचाच होता कॉल... उचलला...
ती म्हटली, "काय रे?, आज ऑफीसला आला नाहीस तो? सुट्टी घेतलीस? सांगितलं नाहीस ते..."
मी "अगं हो.. किती बोलशील? किती प्रश्न विचारशील?"
ती "मग तू बोल ना... "
मी "काही नाही ग, असंच एक काम होतं म्हणून सुट्टी घेतलीये... अचानक घेतलेली सुट्टी, म्हणून गडबडीत सांगायचं राहिलं..."
ती, "अरे, पण निदान साधा मेसेज पाठवायचा होता.. उगाच काळजी वाटत राहते म्हणून विचारलं आपलं.."
मी, "बरं, ते राहू दे, तू आहेस कुठे? निघालीस की नाही कामावरून?"
ती, "हो, सकाळीच निघाले.. आता आहे अर्ध्या वाटेत.. नेटवर्क नव्हता मध्ये.. म्हणून आता कॉल केला.. तुझ्या शहरात येतेय नं.. म्हणून म्हटलं, कॉल करून बघावं, तुला वेळ आहे किंवा कसे..."
मी, "अगं पण तू तर लगेच निघणारेस ना परत.."
ती, "हो रे, ते ही आहेच.. खूप घाईत असणार आहे.. तरीही जर कुठे थोडासा वेळ मिळाला तर बघू.. भेटूयात.. "
मी, "नक्की... "
ती, "चल, आता ठेवते फोन, बॅटरी टिकवायचीये ना मला... मेसेज करते नंतर.."
मी, "ठीक आहे... बोलूयात मेसेजवर.. बाय"
फोन ठेवला आणि कामाला लागलो... स्टेशनला पोहोचायला वेळ लागणार होता.. कारण, मध्ये काही कामं होतीच.. म्हणून घाई केली..
दरम्यान आमचं बोलणं चालूच होतं मेसेजवर... तिचं काम झालं होतं.. आता, ती निघणार होती परतीच्या प्रवासाला.. अन् मी पोहोचत होतो.. स्टेशनवर.. तिला भेटायला..

*


स्टेशनवर पोचतानाच एक विचार आला.. काहीतरी घ्यावं तिच्यासाठी.. काय घ्यावं? विचार चालू असतानाच गाडीची पहिली सूचना आली... गाडी प्लॅटफॉर्मला लागत होती... थोडा अवधी होता म्हणून मी स्टेशन परिसरात काही मिळेल का ते पाहत होतो... पण, काहीच सुचेना.. आणि मिळेनाही.... शेवटी, तो विचार सोडला आणि स्टेशनवर आलो... गाडी प्लॅटफॉर्मवर उभी होतीच... मग पटकन जाऊन आधी आरक्षण तक्ता पाहिला...  माझी सीट माहीत होतीच... पण, मी तिचं नाव शोधत होतो.. .

तेवढ्यात तिचा कॉल आला...
"कुठेस रे?"
"अगं इथेच आहे, स्टेशनजवळ.. थोडा कामात आहे... ते झालं की मग तू निघताना भेटायला येतो... "
अचानक कॉल कट झाला... पुन्हा लावला पण नेटवर्क नव्हतं मिळत.. मग पुन्हा तो रिज़र्वेशन चार्ट बघताना तिचा मेसेज आला..
"अरे, मी गाडीत बसलीये आत्ता... निघेल थोड्यावेळात गाडी..."
मी उत्तर पाठवलं.."अगं पण तू थांबणार होतीस ना थोडा वेळ.. मी थोड्याच वेळात येणार होतो तिकडे... माझं काम झालं की..."

तोवर मला तिच्या बोगीचा नंबर, सीट नंबर मिळाला होता... आणि तो नेमका माझ्याच बोगीतला होता.. आता याला कोणता योग म्हणावा हेच मला सुचत नव्हतं... तेवढ्यात तिचा मेसेज आला...

"अरे... काम जरा लौकरच उरकलं... आणि तसेही या गाडिचेच बुकिंग केले होते... मिळाली गाडी म्हणून निघतीये... सॉरी"

मी पुन्हा रिप्लाय केला... "अगं पण... असो.. गाडी कितीला सुटणार आहे?"

तिचा रिप्लाय... 'आहेत आणखी १५-२० मिनिटे... बघ जमल्यास येऊन जा...'

मी पुढचा मेसेज टाइप करतच होतो आणि तिचा कॉल आला....

"ऐक ना... जमणारे का तुला यायला? म्हणजे गाडी सुटेल आता थोड्याच वेळात..."
मी, "माझं काम उरकलंय आता... मला १० मिनिटे लागतील... पोचतोच मी तिथे..."
ती... "बघ.. लौकर ये.. तेवढीच धावती का होईना भेट होईल..."
"हो... धावतच निघतोय मी... आलोच... "

एवढं बोलून मी कॉल कट केला... आणि बोगीकडे चालू लागलो..

*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा