मंगळवार, १९ एप्रिल, २०११

नुकताच होळीचा सण होऊन गेलेला... उन्हाची तीव्रता वाढलेली.. जणू सूर्य सारी धरणी जाळण्यास निघालेला.. वेळ तशी संध्याकाळची... म्हणजे साधारण चार वाजलेले.. तरीही ऊन मात्र बर्‍यापैकी.. अशा उन्हात "तो" तळ्याच्या काठावर शांत पाण्याच्या लाटांचा आवाज ऐकत बसून होता.. रोजच्या सारखा.. आता त्याला सवयच झाली होती या सर्वांची.. त्यालाच काय कदाचित त्या सूर्याला.. उन्हाला.. तळे अन् त्याच्या लाटांनाही त्याची सवय झाली असावी... गेले कित्येक दिवस तो असाच रोज येऊन शांत तळ्याकाठी बसून असायचा... शून्यात नजर.. मनात असंख्य विचारांनी काहूर माजलेलं.. वार्‍याची झूळुक आली की जणू कोणाची तरी चाहूल लागावी असा अस्वस्थ होऊन तो सगळीकडे पाहायचा... अन् कोणीच दिसत नाही कळल्यावर पुन्हा शून्यात हरवायचा..
याच तळ्याच्या काठावर "ती" त्याला भेटलेली... पहिल्याच भेटीत त्याच्या मनात भरलेली.. इथेच दोघांची गट्टी जमलेली... कितीतरी भेटी घडल्या त्या इथेच.. अगदी याच ठिकाणी... त्यावेळी झाड असायचा इथे... चाफ्याचं.. त्या चाफ्याच्या फुलांची माळ करून रोज तो तिला भेट द्यायचा, तीही आवडीने तो चाफा माळायची... सुंदर दिसायाची... एखादी परिच जणू..
होतीच ती तशी... नाजूक.. गोरिपान... टपोरया घार्‍या डोळ्यांची... नेहमीच आनंदी राहणारी.. स्वतःच्याच स्वप्नांच्या दुनियेत रमणारी.. नेहमी म्हणायची... "तू अगदी माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा आहेस.. मला हवा होतास तसाच..."
तोही विचारायचा... "म्हणजे... नक्की कसा?"...
"ते नाही सांगता येत मला... पण आहेस तू तसा.. एवढं मला माहीत आहे..."
"अगं, पण काहीतरी सांगशील की नाही..."
"नाही सांगता येत मला... पण एक मात्र आहे.. मी स्वप्नात पाहिलंय तुला.. कितीतरी वेळा.. तू भेटायच्या आधीपासून..."
"खरंच.. की उगाच आपलं मला चांगलं वाटावं म्हणून बोलतीयेस..?"
"अगदी खरं... तुझी शपथ.."

अन् मग तो मोहरुन जायचा... तिच्या त्या निरागस.. टपोरया डोळ्यांत हरवून जायचा... कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या नजरेत नजर मिळवून बसून असायचे... काहीही ना बोलता...

या सार्‍या आठवणींत बुडालेला असताना कोणीतरी मागून हाक मरायचं... "काय रे माधव... झाली का समाधी लावून... सूर्य गेला कंटाळून आता... चल बघू घरी..."
तो तसाच विचारांमध्ये... तिच्या आठवणींमध्ये रमत तिथून उठायचा... अन् घरची वाट धरायचा... रोज.. अगदी रोज हे असंच घडायचं...

(To Be Continued... )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा